समाविष्ट 11 गावांसाठी दिला होता निधी : विद्युत विभागाने वळवला
पुणे – समाविष्ट 11 गावांच्या विकासाचा 12 कोटी 81 लाख रुपयांचा निधी महापालिकेच्या विद्युत विभागाने एलईडी दिवे बसवलेल्या “टाटा प्रोजेक्टस लि’ यांच्या “मे. उज्ज्वल पुणे’ नावाच्या “एसपीव्ही’ कंपनीला देण्याचा घाट घातला असून, हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीमध्ये मंजूरही झाला आहे.
शहरातील पथदिवे व्यवस्था सुधारण्यासाठी जुने 77 हजार पथदिवे काढून त्याठिकाणी एलईडी दिवे बसवण्याची निविदा टाटा प्रोजेक्ट्सला मिळाली होती. एसपीव्ही अंतर्गत मे. उज्ज्वल यांनी हे काम केले आहे. 51 टक्के वीजबचतीतील 98.5 टक्के भाग हा संबंधित कंपनीला अदा करण्याविषयी करारात नमूद केले आहे. त्यानुसार एप्रिल 2018 ते मार्च 2019 पर्यंतचे 20 टक्के बिल मे उज्ज्वल यांना अदा करणे बाकी आहे. त्यासाठी 36 कोटी 55 लाख रुपये द्यावे लागणार आहे. त्यातील 23 कोटी 73 हजार रुपयेच शिल्लक असल्याने उर्वरित 12 कोटी 81 लाख रुपये वर्गीकरणातून उभे करावे लागणार आहेत. त्यामुळे 2019-20 च्या अंदाजपत्रकातील पथ सुधारणा, पथावरील दिवाबत्ती आणि समाविष्ट गावांमधील वीजखर्च यासाठी केलेल्या 40 कोटी रुपये तरतुदीतून 12 कोटी 81 लाख रुपये या कंपनीला द्यावे लागणार आहे.
वीजबचतीचे पैसे गेले कुठे?
समाविष्ट गावातील विकासाबाबत आधीच स्थानिक प्रतिनिधींनी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. रस्ते, पाणी आणि वीज याबाबत त्यांनी महापालिकेला साकडे घातले असून, महापालिका प्रशासनानेही राज्य सरकारकडे या गावांच्या विकासासाठी अनुदान मागितले आहे. असे असताना या गावांसाठी केलेली तरतूद अशाप्रकारे वळवली जात आहे. त्यामुळे वीजबचतीचे आजपर्यंत दिले जात असलेले पैसे गेले कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.