विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची चाचपणी

आघाडीत जागांची अदलाबदल होणार

उमेदवार विजयी होण्याचे निकष यंदा लावण्यात येणार आहे. त्यामुळे ही निकष पाळताना मतदारसंघांची अदलाबदल तर होती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला जास्त जागा देखील मिळण्याची शक्‍यता आहे. अदलाबदलमध्ये श्रीगोंदा, शिर्डी या दोन मतदारसंघाचा समावेश आहे.

नगर  – आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 12 विधानसभा मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जात आहेत. येत्या 1 जुलैपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून येत्या 10 ते 15 जुलैपर्यंत उमेदवार निश्‍चित केले जाण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. 12 पैकी नऊ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा दावा पक्षाने केला आहे. अर्थात कॉंग्रेसने देखील सात मतदारसंघाची मागणी केली आहे. राष्ट्रवादीकडून अकोले, कोपरगाव, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, पारनेर, नेवासे, शेवगाव-पाथर्डी, राहुरी या जागांची मागणी करण्यात आली असून वेळ पडली तर शिर्डी मतदारसंघाची जागा देखील राष्ट्रवादी लढविण्यास तयार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

अर्थात कॉंग्रेसने देखील संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, नगर शहर, नेवासे या सात जागांवर दावा केला आहे. दोन्ही पक्षाच्या व्यासपीठावर जागांची मागणी करण्यात आली आहे. अद्याप दोन्ही कॉंग्रेसची एकत्रित जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा वाटपबाबत चर्चा झाली नाही. राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली असून इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 25 ते 1 जुलै या कालावधीत इच्छूकांकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. दाखल अर्जांनी 3 जुलैला मुंबईत छाननी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जिल्हानिहाय बैठका घेवून उमेदवार निश्‍चित करण्याचा मानस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.