मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील महिन्याभरापासून दांडी मारत आहेत. तर, दुसरीकडे मतदार संघातील नागरिक सुद्धा कोल्हेंवर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, शिर्डी येथे मंथन बैठक असूनही त्यास डॉ. कोल्हे यांनी दांडी मारल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
अश्यातच आता भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. यात अमोल कोल्हेंच्या कथित नाराजीवर भाष्य करण्यात आलं आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! pic.twitter.com/wCzCOv1jr5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 6, 2023
भाजप कडून शेअर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो असून, “कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! शरद पवारांच्या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर! पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचा आता पुण्यात निभाव लागणं निव्वळ अशक्य आहे.! असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. अमोल कोल्हे पक्षच्या बैठकांना आणि शिबिराकडे पाठ फिरवत असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.