मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून पक्षातूनच नव्हे तर राज्यभरातून मागणी करण्यात येत आहे. मात्र शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. नवीन अध्यक्ष निवडण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या समितीची उद्या बैठक होणार असून, तेव्हाच नव्या अध्यक्षाचे नाव बहुधा निश्चित करण्यात येणार आहे.
पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पवार यांनी माघार घ्यावी या मागणीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आक्रमक पवित्रा घेताच निर्णयावर दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र अजून तरी तोडगा निघाला नाही उलट आता अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केल्यावर अन्य नेत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवल्याने सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
आंदोलनकर्त्यां कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी काल संवाद साधला. या वेळी राजीनामा मागे घेण्याबाबत पवार यांनी एकही शब्द काढला नाही. उलट राजीनाम्यावर पवार ठाम असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. उद्या नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक बोलावण्याची सूचना पवार यांनी केली.
नवा अध्यक्ष निवडण्याकरिता १८ नेत्यांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्वानी मान्य करावा, अशी सूचनाही पवार यांनी केली. पवारांनी दिवसभर पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा केली. पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असून, सर्वानी विनंती केली तरीही पवार माघार घेणार नाहीत, असे पक्षाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.
पवारांचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत वेगवेगळी नावे घेतली जात असतानाच सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे तर राज्याची धुरा अजित पवार यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्याला पक्षाच्या विविध नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.