कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यातच राज्यातील अनेक राजकीय नेते आणि मंत्री करोनाच्या विळख्यात सापडलेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे.
राज्यात १२ पेक्षा जास्त मंत्री आणि अनेक आमदारांना करोनाची लागण झाली आहे. यात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, केसी पाडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांच्यासह एकूण १० मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याशिवाय भाजपा आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांनाही करोनाची बाधा झाली आहे.