पुणे – लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता जाहीर प्रचाराला सुरूवात झाली असून, पवार कुटुंबातील नातेसंबंध आणखी ताणले गेले आहेत. एका जाहीर सभेत मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर टीका केली. तोच धागा पकडत आमदार रोहीत पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षफुटीनंतर रोहित पवार हे काही प्रसंगीत अजित पवारांचे नाव न घेता टीका करत होते. मात्र, आता त्यांनी थेट अजित पवारांचे नाव घेऊन टीका सुरू केली आहे. “अजितदादा तुम्हाला राजकारणात ज्यांनी सेट केले, सगळे काही दिले त्या आदरणीय शरद पवार साहेबांना सोडल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यासाठी तुम्ही चीटर, खंडणीखोर, धमकी देणारा आणि जेलवारी करुन आलेल्यांची मदत घेता आणि स्वतः मात्र मान खाली घालून शांत बसता. हाच का तुमचा स्वाभिमान?’ असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच “शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी भाडोत्री लोकांचा वापर करण्याचे तुमचे हे राजकारण कोणालाच पटणारे नाही. तुमच्यात झालेला हा बदल समजण्यापलीकडचा आहे,’ अशा शब्दांत अजित पवारांचा समाचार घेतला आहे.