Nawab Malik denied bail – माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना PMLA कोर्टाने जामीन नामंजूर केल्याने मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच कथित पत्राचाळ घोटाळ्यात अटकेत असलेल्या संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली होती. अशातच मलिक यांच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होत. मात्र न्यायालयाने आज त्यांना जामीन नाकारल्याने मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात तूर्तास दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांसह बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करून मनी लाँड्रिंग केल्या प्रकरणात मलिक अटकेत आहेत.
या पप्रकारणी आज मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. यावर २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार होती मात्र न्यायालयाने कागदपत्र तयार नसल्याने ती ३० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली होती.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मलिक यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी, मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता.
Money laundering case | PMLA Court rejects the bail application of NCP leader and Maharashtra’s former minister Nawab Malik.
(File photo) pic.twitter.com/2rLXHg3wgI
— ANI (@ANI) November 30, 2022
गोवावाला कंपाउंड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणाऱ्या मलिक यांची गेल्या काही महिन्यांपासून जामिनासाठी धावाधाव सुरू आहे. मात्र न्यायालयाने आज जामीन नाकारल्याने त्यांना तूर्तास तरी दिलासा मिळालेला नाही. ( Nawab Malik denied bail )