सातारा – सातारा जिल्ह्यातील 11 तालुका पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींच्या मंगळवारी (दि. 31) झालेल्या निवडीत कोरेगाव, कराड, पाटण, खटाव, वाई, फलटण, महाबळेश्वर, खंडाळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले.
अपेक्षेप्रमाणे सातारा आणि जावळी पंचायत समितीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले वर्चस्व कायम राखले. माण पंचायत समितीत शिवसेनेच्या शेखर गोरे यांनी अनिल देसाई यांच्या मदतीने राष्ट्रवादीकडून सभापतीपद खेचून आणले, तर उपसभापतीपद राष्ट्रवादीला मिळाले. कराड पंचायत समितीचे सभापतिपद ना. बाळासाहेब पाटील गटाकडे तर उपसभापतिपद उंडाळकर गटाला मिळाले तर खंडाळा पंचायत समितीत सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर उपसभापतिपद कॉंग्रेसला मिळाले.
सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक सदस्यांना सभापती व उपसभापती पदाचे वेध लागले होते. सातारा पंचायत समितीची सत्ता भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे होती. सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने या पदासाठी किडगाव गणातील सौ. सरिता इंदलकर व अंबवडे गणातील विद्या देवरे यांच्यात रस्सीखेच होती.
उपसभापतिपदासाठी अरविंद जाधव, आशुतोष चव्हाण, राहुल शिंदे यांची नावे चर्चेत होती. आ. शिवेंद्रराजे यांच्या सूचनेनुसार सभापतिपदासाठी सौ. सरिता इंदलकर आणि उपसभापतिपदासाठी कारी गणातील अरविंद जाधव यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सातारा पंचायत समितीत आ. शिवेंद्रराजेंचे 11, माजी खासदार उदयनराजे यांचे 6 तर भाजपचे 3 सदस्य आहेत.
सातारा पंचायत समितीत पुन्हा मनोमिलन झाल्याचे दिसून येत आहे.
कोरेगाव पंचायत समितीची सत्ता माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे होती. पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पुन्हा विद्यमान पदाधिकारीच राहणार की उत्तर कोरेगावच्या संजय साळुंखे यांना बढती देऊन सभापतिपद मिळणार, याकडे जनतेचे लक्ष होते. मात्र, शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी राजाभाऊ जगदाळे यांची सभापतीपदी तर संजय साळुंखे यांची उपसभापतीपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. वाई पंचायत समितीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असून सभापतिपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. पाचवड गणातील संगीता चव्हाण या सभापतिपदासाठी एकमेव दावेदार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी अभेपुरी गणातील विक्रांत डोंगरे यांची निवड झाली.
फलटण पंचायत समितीवर ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता आहे. सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले झाल्याने या पदासाठी आसू गणाचे सदस्य व जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, वाठार निंबाळकर गणाचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यात रस्सीखेच होती. मात्र, ऐनवेळी सभापतिपदी शिवरुपराजे खर्डेकर आणि उपसभापतिपदी सौ. रेखा खरात यांची निवड करण्यात आली. कराड पंचायत समितीमध्ये ना. बाळासाहेब पाटील आणि उंडाळकर गटाने एकत्रित येवून सत्ता प्रस्थपित केली होती.
अडीच- अडीच वर्षाच्या फॉर्मुल्यानुसार ना. बाळासाहेब पाटील गटाचे प्रणव ताटे यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. कराड पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. उपसभापतिपदी उंडाळकर गटाच्या रमेश देशमुख यांची वर्णी लागली. पाटण पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता असून पुढील अडीच वर्षासाठी सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. या पदासाठी शिरळ गणातील राजाभाऊ शेलार आणि म्हावशी गणातील उज्वला लोहार यांच्यात रस्सीखेच होती.
मात्र, विक्रमसिंह पाटणकर यांनी सभापतिपदी राजाभाऊ शेलार आणि उपसभापतिपदी प्रतापराव देसाई यांना संधी दिली. जावळी पंचायत समितीवर आ. शिवेंद्रराजे यांची निर्विवाद सत्ता आहे. सभापतिपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने सौ. जयश्री गिरी या सभापतीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. त्यानुसार जयश्री गिरी यांची वर्णी लागली. उपसभापतिपदी सौरभ शिंदे यांची निवड झाली. खटाव पंचायत सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. पुसेसावळी गणातील जयश्री कदम व रेखा घार्गे या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.
अखेर पक्षश्रेष्ठींनी रेखा घार्गे यांना सभापतिपदाची संधी दिली. उपसभापतिपदाची लॉटरी आनंदराव भोंडवे यांना लागली. महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. विद्यमान सभापती रुपाली राजपुरे की अंजना कदम यांना पक्ष संधी देणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादीने अंजना कदम यांना सभापतिपद तर संजय गायकवाड यांना उपसभापतिपद देवून त्यांचा गौरव केला. माण पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. निवडीदरम्यान नाट्यमय घडामोडी होऊन शेखर गोरे व अनिल देसाई यांनी एकत्र येत राष्ट्रवादीच्या ताब्यातील सभापतिपद हिसकावले.
कविता जगदाळे यांची सभापतिपदी वर्णी लागली. आ. जयकुमार गोरे गटाच्या सदस्यांनी आश्चर्यकारकरित्या राष्ट्रवादीच्या तानाजी कट्टे यांना मदत केल्याने त्यांची उपसभापतिपदी वर्णी लागली. खंडाळा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते. या पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता होती, त्यानुसार तांबे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या वंदना धायगुडे यांची निवड करण्यात आली. खंडाळा पंचायत समितीत महाविकास आघाडी झाल्याचे दिसून येत आहे.