सभापतिपदी ओझरकर, उपसभापतिपदी केदारी
पिरंगुट (वार्ताहर) – मुळशी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे पांडुरंग मारूती ओझरकर तर उपसभापतिपदी विजय अरूण केदारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पंचायत समितीसाठी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राधिका कोंढरे, पांडुरंग ओझरकर, कोमल वाशिवले, कोमल बुचडे हे चार आणि सचिन साठे, विजय केदारी हे दोन शिवसेनेचे सदस्य विजयी झाले होते. सुरूवातीची अडीच वर्षे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे अनुक्रमे वाशिवले, बुचडे, कोंढरे यांनी प्रत्येकी दहा महिने सभापतिपदाची धुरा सांभाळली होती. दरम्यान ओझरकर सलग अडीच वर्षे उपसभापती होते. त्यानंतर हे पद सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाल्याने या पदासाठी ओझरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता.
सोमवारी (दि. 30) शिवसेनेचे विजय केदारी यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे उपसभापतिपदाबाबत केदारी यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला. सभापतिपदासाठी ओझरकर आणि उपसभापतिपदासाठी केदारी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. यानिवडीवेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांसह शिवसेनेचे सचिन साठे उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण झाली.
माणला प्रथमच सभापतिपदाची संधी
ओझरकर यांच्या रूपाने आयटीनगरी म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या माण गावाला प्रथमच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. तर माजी सभापती (कै.) पांडूरंग राऊत आणि (कै.) माउली सातव यांच्यानंतर 22 वर्षांनंतर लवळे गावाला उपसभापतिपदाचा मान मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी सदस्यांना विश्वासात घेवून विविध विकासकामे करणार असल्याचे ओझरकर, केदारी यांनी यावेळी सांगितले.