नगर -राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील प्रश्न सोडविण्यास कटिबध्द आहे. युवकांना पक्षात काम करण्यास संधी देत असल्याने एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाला आहे. शहरासह जिल्हा पातळीवर काम करण्यासाठी युवक राष्ट्रवादीशी जोडला जात आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर सचिवपदी सुफीयान शेख, शहर उपाध्यक्षपदी मिजान कुरेशी व वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन पदाधिकाऱ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, यावेळी आ. जगताप बोलत होते.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, शाहनवाझ शेख, ताज खान, अन्सार सय्यद, शहेजाद खान, फईम इनामदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले. साहेबान जहागीरदार यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा विविध उपक्रमाच्या माध्यमातून सुरु असलेले सामाजिक कार्य, अल्पसंख्यांक समाजातील युवकांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क व काम करण्याची तळमळ पाहून त्यांना अल्पसंख्यांक शहर विभागाचे पद देऊन महत्त्वाची जबाबदारी सोपविली असल्याचे सांगितले. अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न शासनस्तरवार सोडविण्यासाठी व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करुन पक्ष संघटन करणार असल्याचे भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.