पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए- मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे तसेच पक्षाचे सर्व माजी महापौर, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सोमवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गव्हाणे म्हणाले, शरद पवार यांनी त्यांच्या 55 वर्षाच्या सामाजिक व राजकिय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरीक यांना केंद्रबिंदू मानून काम केले आहे. आपल्या देशात विविध जाती-धर्म, पंथांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व प्रचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने -ईद-ए-मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गव्हाणे म्हणाले.
भाजप व मनसेवर टीका
सध्या केंद्रातील भाजपा सरकार हे राज्यातील ज्या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपत आलेले आहे, अशा राजकीय पक्षाला पुढे करून महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे तसेच प्रक्षोभक भाषणे करून हिंदू-मुस्लिम यामधील दरी निर्माण करण्याचे काम करताना दिसत आहे, असा आरोप गव्हाणे यांनी केला आहे.