नाशिक – आयपीएलच्या सट्ट्याप्रकरणी कारवाई न करणे आणि सट्टा सुरळीत सुरू ठेवणे यासाठी तीन लाख रूपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. महेश शिंदे (वय, 38) असे अटक झालेल्या लाचखोर पीएसआयचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल सट्टा सुरु ठेवण्यासाठी पीएसआय शिंदेनी संजय खराडे नामक एका खासगी व्यक्तीमार्फत शनिवारी तक्रारदार यांना चार लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती गुरूवारी तीन लाख रूपये देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची नसल्याने त्यांनी यासंदर्भात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून नाशिक एसीबीने खासगी व्यक्ती संजय खराडे यास लाच स्वीकारताना रंगेहात अटक केले.