Supriya Sule : राज्यात मागील काही दिवसांपासून आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील निष्पाप लोकांचा बळी जात आहे. नांदेडमधील सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाने या मुद्द्याला वाचा फोडली आहे. त्यामुळे सरकारवर विरोधकांनीदेखील निशाणा साधला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेही चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी व्यक्त करताना त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, “राज्यातील ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे औषधे आणि तत्पर सेवेच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. या सर्व घटना महाराष्ट्र राज्याच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. केवळ शासनाचा नाकर्तेपणा आणि दुर्लक्षामुळे हे मृत्यू घडून आले. विद्यमान सरकारचा आरोग्यसेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात आल्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवांचे हेल्थ ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेणार आहे. तसेच जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी देखील आरोग्य सुविधांचा नियमितपणे आढावा घ्यावा. रुग्णांच्या उत्तम व सजग आरोग्य सुविधांसाठी हे गरजेचे आहे.” असे म्हटले आहे.
तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी “पुणे जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी अतिशय सोयीचे आणि महत्वाचे हॉस्पिटल ससून येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अडचणी असल्याचे आढळून आले आहे. ससूनकडून औषधे खरेदीसाठी हाफकिन या संस्थेला सहा कोटी देण्यात आले.परंतु अद्यापही औषधपुरवठा करण्यात आला नाही.याखेरीज येथे मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.यामुळे रूग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी, पुणे यांनी यात तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.