मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना जेजुरीकरांचे निवेदन
जेजुरी – जेजुरी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा असावा आणि पुणे – बेळगाव रेल्वेगाडीस मार्तंडविजय एक्स्प्रेस असे नाव देण्यात यावे, खानपान विभाग सुरु करावा, महिला रेल्वे पोलीस यांची 24 तास नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन विविध संघटनांकडून देण्यात आले.
जेजुरी (ता. पुरंदर) येथे नव्याने विकसित होत असलेल्या रेल्वेस्थानकाच्या कामकाजाची व छोटी रेल पथ यंत्रसामुग्री प्रदर्शनाची पाहणी मध्यरेल्वे प्रशासनाचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, रेल्वे कमिशनर के. जैन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी केली. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जेजुरीगडाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीची पाहणी करण्यात आली.
यावेळी जेजुरी नगरीच्यावतीने माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, डॉ. दिगंबर दुर्गाडे, युवराज काकडे, संजय जगताप, राजू पानसरे, विजय खोमणे, प्रवीण शिंदे यांनी शाही पगडी देऊन त्यांचे स्वागत केले. शिल्पकार दिनकर थोपटे यांनी जेजुरी मंदिराची भव्य प्रतिमा संजीव मित्तल यांना भेट दिली. पुणे – कोल्हापूर लोहमार्गावर जेजुरी स्थानक येत असून या स्थानकाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली.
या करिता कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सद्या द्रुतगती मार्गाची कामे विद्युतीकरण कामाचा वेग जरी रेल्वे प्रशासनाने झपाट्याने सुरू केला असला तरी मात्र गेली चार – पाच महिने मुंबई मार्गाकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस बंद असल्याने आणि वेळेत न धावणाऱ्या काही गाड्यांमुळे चाकरमानी वर्ग गरीब लोकांना पाच पट पैसा देऊन प्रवास करावा लागत आहे.
प्रदर्शनाला अधिकाऱ्यांची भेट
येथे नव्याने विकसित होत असलेले रेल्वेस्थानक, छोटी रेल पथ यंत्रसामुग्रीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी मध्यरेल्वे प्रशासनाचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, रेल्वे कमिशनर के. जैन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी या प्रदर्शनास भेट दिली.