श्रीक्षेत्र वीर येथे भक्तिमय वातावरणात हळदी समारंभ उत्साहात ः भाविक, भक्तांची गर्दी
परिंचे – श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे माघ शुद्ध पौर्णिमेला श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा असून शुक्रवारी (दि. 7) समस्त मानकरी राऊत यांच्या हस्ते देवाचा हळदी समारंभ पार पडला. हळदी समारंभाच्या निमित्त पहाटे पाच वाजता महापूजा होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दुपारी दोन वाजता देवाचे मानकरी समस्त राऊत मंडळी देऊळवाड्यात आले. वाजत गाजत देवाची हळद मंदिरात आणण्यात आली. विधिवत पूजा, पोशाख व फुलांच्या मंडवळी देवाला बांधण्यात आली.
भाविकांत समाधान
वीर यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी आदी व्यवस्था पुरविण्यात आल्या आहेत. वीर ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी सार्वजनिक स्वच्छता, ठिकाणी कचराकुंड्या, 24 तास पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालय आदी व्यवस्था पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
समस्त राऊत सुवासिनींच्या हस्ते देवाला हळद लावण्यात आली. परिसरातील महिला भाविकांनी देवाला हळद लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी ग्रामस्थ, पाटील, विश्वस्त, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी हजर होती. रात्री नऊ वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी दर्शनबारी तीन ठिकाणी वाहनतळ, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी आदी व्यवस्था पुरविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संभाजी धुमाळ व सचिव तय्यब मुलाणी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक स्वच्छता, ठिकाणी कचराकुंड्या, 24 तास पाणीपुरवठा, दिवाबत्ती, सार्वजनिक शौचालय अशा प्रकारची सर्व व्यवस्था पुरविण्यात आल्या असल्याचे सरपंच माऊली वचकल यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे उपस्थित होते.