मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी या ठिकाणी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांना अहंकार आहे तो त्यांनी सोडला पाहिजे अशी टीका नामदेव शास्त्रींनी केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना सडेतोड उत्तर दिले आहे.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना नामदेव शास्त्री यांनी “मी पंकजाला मुलगी मानलं आहे. त्यामुळे मी तिच्या विरोधात कधीच जाणार नाही. मात्र तिच्या जवळचे चमचे हरामखोरपणा करतात. पंकजा मुंडे यांनाही खूप अहंकार आहे. त्यांनी त्यांचा अहंकार सोडला पाहिजे. पंकजा आणि धनंजय मुंडे दोघांचंही आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठे झालात तरीही तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे अहंकार नाही.” असे म्हणत नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.
तर दुसरीकडे नामदेव शास्त्रींच्या टीकेला पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणातून सडेतोड उत्तर दिले आहे. ” माझा जन्म स्त्रीच्या रुपात झाला आहे. मी जर जोरात बोलले तर तो अनेकांना अहंकार वाटतो. एखादा पुरुष जोरात बोलला तर त्याला वाघ म्हटलं जातं. १०० चुका करणाऱ्या पुरुषाला सुधारण्याची संधी मिळते. मला कुठलाही अहंकार नाही. मी फक्त गडाच्या पायथ्याची एक पायरी आहे.” असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना प्रत्युत्तर दिले आहे.