शहरात नालेसफाईला मुहूर्त लागणार कधी?

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धावाधाव होणार

नगर – महापालिकेच्या नालेसफाई मोहिमेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. पण यंदा प्रशासनाने अद्याप निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला विलंब लागणार आहे. परिणामी वेळेत नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण होण्याबाबतही साशंकता आहे. पावसाळा महिन्यावर आला असून, ही सफाईची मोहीम सुरू नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सफाईसाठी धावाधाव होणार आहे.

शहरात ड्रेनेज व्यवस्था कालबाह्य झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहते. शहरातील दिल्ली दरवाजा, चितळे रस्ता, टिळक रस्ता, माळीवाडा आदी शहरांच्या मुख्य भागातील प्रमुख रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा डोहच साचत असतो. पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने हे पाणी पाऊस पडल्यानंतर तास दोन तास थांबून राहते. याशिवाय शहराच्या उपनगरांमध्येही गटारीची सुविधा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. उपनगरात मोठ्या उघड्यावर नाले आहेत. अर्थात ते आता नाले राहिले नाही तर सांडपाणी पाहणाऱ्या गटारी झाल्या आहेत. या गटारींमध्ये सांडपाण्याबरोबर कचरा देखील टाकण्यात येते. त्यामुळे लहान पुलाखाली असलेल्या पाईप कचऱ्यासह गाळाने भरून पावसाळ्यात हे सांडपाणी रस्त्यावर वाहते. याचीही सफाई केली नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून कसलेच नियोजन होत नाही. मग घाईगडबडीत नाल्याची सफाई होते. पावसाळ्यात नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने उपनगरात पाणी शिरते. ऐन पावसाळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सफाईच्या कामावर लावले जाते.हा दरवर्षीचा शिरस्ता बनला आहे. अजूनही महापालिकेत नालेसफाईची साधी बैठक देखील झालेली नाही. त्यामुळे नालेसफाई यंदा होणार की नाही असा प्रश्‍न आहे. त्यात लोकसभेच्या आचारसंहितेचा अडसर आहे. आचारसंहिता एप्रिल, मे महिन्यात लागणार, याची कल्पना साऱ्यांनाच होती. त्यामुळे मार्च महिन्यात नालेसफाईचे नियोजन करता आले असते. निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराकडून मे महिन्यात काम करून घेता आले असते. पण प्रशासनस्तरावर त्याबाबत कुणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून आले. अर्थात महापालिका प्रशासन उदासिन असल्याने कोणतेही काम वेळेत होईल, याची शक्‍यता कमी असते.

प्रशासन तर काम टाळण्याचे पाहत आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी तरी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण कोण लक्ष देणार असा प्रश्‍न आहे. आता तर मे महिना उजाडला तरी निविदा देखील काढली नाही. त्यातही आचारसंहिता शिथिल होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेवून निविदा काढण्याचा निर्णय होईल. त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जाणार, मग ठेकेदाराला वर्कऑर्डर, समन्स देऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्यास मे महिन्याच्या शेवटचा आठवडा उजाडला तर ठिक नाही तर ऐन पावसाळ्यात गेल्या वर्षीप्रमाणे नालेसफाईचे काम करण्यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.