चंदनचोरांची माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या घरावर दगडफेक

सुमित कोल्हे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

कोपरगाव (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगाव शिवारातील वस्तीवर चंदन चोरांन धुमाकूळ घातला. त्यांनी चंदनाच्या झाडांची कत्तल करून ती चोरून नेली. यावेळी त्यांनी तुफान दगडफेक केली. युवा नेते सुमित कोल्हे यांनी दरोडेखोरांशी दोन हात केल्याने पुढचा अनर्थ टळला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हे यांच्या वस्तीवर 8 ते 10 दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत सुरक्षारक्षकांची नजर चुकवून घराच्या पाठिमागील परिसरात आले. तसेच घराशेजारी असलेली चंदनाची मोठी झाडे करवतीने कापू लागली. कापलेले एक चंदनाचे झाड जमिनीवर कोसळल्याने त्याचा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने सुरक्षारक्षक व कोल्हे परिवारातील सदस्य जागे झाले. सुरक्षारक्षकाला समोर 5 चोरटे दिसताच त्याने सुरक्षेचा इशारा म्हणून सायरन वाजवला. सायरनच्या आवाजाने कोल्हेवस्ती व परिसरातील ग्रामस्थ सतर्क झाले.

याच दरम्यान सायरनच्या आवाजाने चोरट्यांनी सुरक्षारक्षकावर दगडफेक सुरू केली. तर काही जण कोल्हे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाकडे लक्ष ठेवून होते. घरातून कोणी बाहेर आले, तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र सुमित कोल्हे यांनी घरातील सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत धीर दिला. चोरट्यांशी दोन हात करण्यासाठी सुमित कोल्हे धाडसाने पुढे सरसावल्याने तीन सुरक्षारक्षक व सुमित कोल्हे यांनी दरोडेखोरांवर प्रतिहल्ला करुन त्यांना पळवून लावल्याने पुढचा अनर्थ टळला. चोरटे गोदावरी डाव्या कालव्याच्या झाडीतून अंधारात पळून गेले. सुरक्षारक्षकाच्या समक्ष चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून तो चोरून नेला.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षक घनश्‍याम पोपट नेटके (रा. खिर्डीगणेश) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चोरट्यांनी अंदाजे 15 हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरून नेले आहे. या फिर्यादीवरून अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी चोरट्यांनी झाडे तोडण्यासाठी पावरलेली हत्यारे आढळून आली.

दरम्यान, तालुक्‍यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जेथे 24 तास सुरक्षारक्षक असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरापर्यंत जावून चोरट्यांची टोळी चोरी करुन उलट त्यांच्यावर प्रतिहल्ला करीत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? चोरी करणारे शस्त्रानिशी माणसावर हल्ला करतात. याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. चोरांना पोलीसांचा धाक नसल्याने अशा घटना घडत आहेत, अशी खंत युवा नेते सुमित कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.