नगर – गेल्या दोन दिवसांपासून एकही करोना बाधित रुग्ण न आढळल्याने नगर जिल्ह्याच्या दृष्टीने हे दिलासादायक चित्र असून आज तब्बल 56 जणांचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल 69 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आता केवळ 22 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, फ्रान्स येथील करोना बाधित परदेशी नागरीकाचा 14 दिवसानंतरचा अहवाल दुसऱ्या वेळेला निगेटिव्ह आला असल्याने लवकरच त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दि. 13 रोजी नेवासे शहरात करोनाचा बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 28 वर गेली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भरत पडली. दि. 14 रोजी नव्याने करोनाचा रुग्ण आढळला नाही तरी करोना बाधित दुसरा बळी मात्र गेला. कोपरगावमध्ये 60 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर दुसरीकडे मात्र पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून तपासणीचे 69 अहवाल प्राप्त झाले.
ते सर्वच निगेटिव्ही असल्याने दिलासा मिळाला. त्यानंतर आज लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून 56 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते देखील सर्वच निगेटिव्ह आहेत. त्यात नेवासे येथील 24, श्रीरामपूर येथील 11, नगर शहरातील 6, राहात्यातील 3, पाथर्डीमधील 2, राहुरीमधील 2, कोपरगावमधील 4 तसेच अकोले, संगमनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका जणाचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.
करोना बाधित फ्रान्समधील परदेशी नागरिकाचा दि. 14 रोजी 14 दिवसानंतरचा अहवाल बाधित आला होता. पण आज 56 जणांच्या अहवालामध्ये या परदेशी नागरीकाच्या नमुन्याचा समावेश होता. तो अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा दुसरा अहवाल आहे. त्यामुळे आज पुन्हा त्याचे नमुने पाठविण्यात येतील. ते उद्या निगेटिव्ह आल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळले.