नैनीताल – वेळेपूर्वीच हजेरी लावलेला मोसमी पाऊस उत्तराखंड राज्यात संकटासारखा कोसळत आहे. नद्या-नाल्यांचे उग्र रूप पाहायला मिळत आहे, तर अनेक ठिकाणी रस्ते उद्वस्त झाले आहेत. भवाली अल्मोडा राष्ट्रीय महामार्गावर थुवा टेकडीवरून दरड कोसळल्याने रस्त्यावर दगड ढासळल्याने वाहतूक ठप्प झाली. येथे मुसळधार पावसामुळे शिप्रा नदीला पूर आला असून लोकवस्तीच्या परिसरात पाणी शिरले.
बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात राडारोडा रस्त्यावर आल्याने धारी-पोखराड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ व प्रवाशांचे हाल होत आहेत. धारी-पोखराड रस्त्यावर राडारोडा आल्याने रस्त्यावरील वाहनांची ये-जा थांबली आहे. पदमपुरी येथून कासियालेख-भाटेलिया मार्गे आणि पोखराड आंतरमहाविद्यालय मार्गाने वाहने पाठवली जात आहेत. ढिगारा हटविण्यासाठी जेसीबी मागवण्यात आले आहेत.
नैनिताल नदीच्या नाल्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे रस्ते जवळपास वाहून गेले आहेत. तर नदी-नाले तुंबले आहेत. हरिद्वारमध्ये पावसामुळे कंखलच्या लाटोवली येथील जीर्ण घराची भिंत कोसळली. बाहेर उभ्या असलेल्या एका कारचे ढिगाऱ्यामुळे नुकसान झाले.
पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेले प्रशासनाचे पथकही पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याबरोबरच घटनास्थळाची पाहणी करत आहे. बद्रीनाथ महामार्गाला अडथळा निर्माण झाल्याने चमोलीतील छिन्का येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. येथे डोंगरावरून ढिगारा आल्याने महामार्ग बंद झाला आहे.