हासन (उत्तर कर्नाटक) – देशात टोमॅटोच्या दराने विक्रम मोडले आहेत. टोमॅटोचे भाव देशभरात 100 ते 150 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणात टोमॅटोचा वापर करणे हे वास्तवापासून दूरच आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने उत्तर कर्नाटकातील हासन जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या शेतातून लाखो रुपयांचे टोमॅटो चोरट्यांनी पळवून नेले आहेत.
ही टोमॅटो चोरीची घटना 4 जुलैच्या मध्यरात्रीची आहे. हासन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील धारणी या महिला शेतकऱ्याच्या शेतातून अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेल्याचे दिसून आले आहे.
धारणी यांनी दोन एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतल्याचे सांगितले. टोमॅटोचे पीक घेऊन ते बंगळुरूच्या बाजारपेठेत विकण्याचा त्यांचा विचार होता. सध्या बेंगळुरूमध्ये टोमॅटोचा भाव 120 रुपये प्रति किलोच्या वर पोहोचला आहे.
धारणी यांनी हळेबिडू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, आमचे आधीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कर्ज घेऊन आम्ही टोमॅटो पिकवले. आमच्याकडे चांगले पीक आले आणि योगायोगाने टोमॅटोचे भाव सध्या जास्त आहेत. पण, चोरट्यांनी आमचे 50-60 पोती टोमॅटो घेऊन पोबारा केल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, धारणी यांच्या मुलानेही राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.