नगर -नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) 40 लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड करण्यात आला आहे. अर्बन बॅंकेचे 31 मे 2018 पूर्वीचे जे लेखापरीक्षण करण्यात आले त्या लेखा परीक्षणामध्ये बॅंकेचे उत्पन्न व दिलेल्या कर्जाची थकबाकी याबाबत आरबीआयची जी नियमावली आहे, त्या नियमावलीचे पालन करण्यात आलेले नाही असे आढळून आले आहे.
आरबीआयच्या आयआरसी या तरतुदीचेपालन केले नाही असे आरबीआयचे म्हणणे आहे. 27 मे रोजी आरबीआयने हा दंडाचा आदेश काढला आहे. अनिमित कारभारामुळे अर्बन बॅंकेवर सध्या प्रशासक कार्यरत आहे. त्यातच बॅंकेला हा नवीन धक्का बसला आहे. 40 लाख रुपये दंड हा खूप मोठा दंड असल्याचे बॅंकिंग क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.