सगळे जग सध्या करोनामुळे बंद आहे. या काळात औषध निर्मिती कंपन्या व त्यातील कामगार वर्ग न डगमगता, न घाबरता चोवीस तास काम करून देशाला लागणाऱ्या औषधांचा पुरवठा करीत आहे. जेणेकरून लोकांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही. कोणाचेही आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठीच फार्मा केमिस्ट कामगार वर्ग चोवीस तास काम करत आहे.
दररोज आपल्या घरातून निघून करोना संकटात जीवघेणा प्रवास करत आहे आणि आपल्या देशासाठी योगदान देत आहे. ती देखील एक देशसेवाच आहे. पण या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे जनतेने कधीच कौतुक केलेले नाही, याचा खेद वाटतो. या क्षेत्रात काम करणाऱ्यांचेही कधीतरी कौतुक व्हायला हवे. त्यांनाही वाटत असेल ना! कधीतरी, कोणीतरी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. अशा औषध निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांना माझा सलाम.
नितीन गरड , मढेवडगाव, ता. श्रीगोंदा । संपर्क: 9975386566
करोनारुपी जागतिक महामारीच्या या संकटात लॉकडाऊनची घोषणा झाली आणि संपूर्ण देशात सर्व जनतेला सक्तीने घरी बसावे लागले. सर्व देश जणू काही स्तब्ध झाला. सर्व दुकाने, कारखानदारी व्यवसाय एकाएकी बंद झाले. म्हणजे आर्थिक संकटच कोसळले. पण यात एक चांगली गोष्ट सुद्धा घडली, ती म्हणजे या धावपळीच्या युगात सर्वच कामे घड्याळाच्या काट्यावर चालली होती. ती अचानक थांबल्याने प्रत्येकाला स्वतः कडे बघायला वेळ मिळाला. घरातील नातेसंबंध जोपासणे, मुलांना योग्य संस्कार, आई-वडीलाची काळजी घेणे, या सर्व गोष्टींत भौतिक सुखाची गरजच वाटली नाही. बऱ्याच जणांचे शारीरिक आजारपण देखील पळून गेले. कारण शरीराला गरज होती, ती आरामाची आणि ती या लॉकडाऊनमध्ये ती पूर्ण झाली. ध्यानधारणा, योगासने व्यायामाची आपोआप सवय लागून गेली. या महमारीच्या संकटात सोशल डिस्टन्ससिंग, शरिराची स्वच्छता, वारंवार हात धुणे, अतीमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणे अंगवळणी पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे, या महामारीत आपला जीव धोक्यात घालून समाजाला जपणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, महापालिका कर्मचारी, पोलिस प्रशासन या सर्वांना आपण सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वांनी नियम पाळले तर आपण या संकटावर सहज मात करून शकतो. चला तर मग “एक निर्धार करू, या करोनावर मात करू’
सुहास करंडे पाटील वरिष्ठ विक्री व्यवस्थापक, स्टार हेल्थ इन्शुरन्स नगर संपर्क: 7588605207