व्यावसायिकांचे क्रांती चौकात बेमुदत उपोषण
शेवगाव – शेवगावातील क्रांती चौकात गेल्या ३० ते ४० वर्षांपासून फळफळावळ, वडापाव, भजेपाव, भेळ, अंडापाव, आईस्क्रिम तसेच, सोडा विक्रेते हातगाडया लावून व्यवसाय करत आहेत. त्यांना गेल्या आठवड्यात मंगळवार दि. ५ पासून हातगाड्या लावण्यास पोलिसानी मज्जाव केला असल्याने या व्यावसायिकांनी क्रांती चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हातगाडी धारकांना सहा महिन्यांपूर्वी शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षकांनी हातगाडी धारकांची बैठक घेऊन काही सूचना करून नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हातगाडी धारकांनी आपल्या हातगाडीवर नो पार्कींग बोर्ड लावले .त्याचबरोबर आपला व्यवसाय करण्यासाठी सा.बां.उपविभागाकडून रस्त्यावर पांढरे पटटे मारून घेतले. आपापले व्यवसाय सुरळीत सुरू केले.
तथापि, गेल्या आठवड्यात मंगळवारी (दि. ५ ) पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या हातगाडीधारकांना या ठिकाणी तुमचे अतिक्रमण असल्याचे सांगून हातगाडया लावण्यास प्रतिबंध केला. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगितले आहे. रोजीरोटीचा व्यवसायच बंद झाल्याने हातगाडी धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना वरिष्ठांनीच अगोदर दिलेल्या सवलती व नियमानुसार व्यवसाय करू देण्याच्या मागणीसाठी आजपासून या व्यावसायिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
न्याय न मिळाल्यास अन्नपाणी त्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कॉ.संजय नांगरे, राहुल सावंत, सतीश बोरूडे, संजय लहासे, तान्हाजी मोहिते, चंद्रकांत कर्डक, सुभाष पाटील लांडे, बाळासाहेब लष्करे, संदीप काथवटे, गणपत भाडाईत, सय्यद मोसिन, इरफान पठाण, पप्पुभाई तांबोली, राजु मोहिते, बबलु गुप्ता, सचिन शिनगारे, रावसाहेब गुंजाळ, आदिल आतार, मुन्ना भोकरे, किरण गायकवाड, सतीश गायकवाड, शेख जावेद असिफ, जावेद बागवान, जुबेर शेख, इरफान पठाण, अश्पाक बागवान आदींच्या निवेदनावर सहया आहेत.