‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेतला इन्स्पेक्टर ‘अर्जुन वर्षा विनायक कदम’ म्हणजेच अभिनेता ‘रोहित परशुराम’ ह्याच्या लहान मुलीला म्हणजेच रुईला १०० दिवस पूर्ण झाले. ह्या निमित्ताने रोहितने एक छान छोटासा कार्यक्रम शाळेत साजरा केला.
आजगाव मधील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत जाऊन रोहितने मुलांना परीक्षेसाठी आणि लेखनासाठी पॅड भेट दिले. रोहितने प्रेरणा देणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले व इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया म्हणजे राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, इंदिरा गांधी, प्रियांका चोप्रा, सायना नेहवाल आणि गीता फोगत ह्यांचे चित्र आणि नुकताच यशस्वी झालेला चंद्रयानाचा क्षण लक्षात राहावा म्हणून त्याचेही चित्र स्टिकर पॅड वर लावले आहे.
ह्या भेटवस्तू सगळ्या मुलांना देतानाचे क्षण त्याने व्यक्त करताना सांगितले की, “त्या भेटवस्तू देताना निरागस मुलांच्या चेह-यावरचा आनंद मला खूप सुख देऊन गेला. त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व इतिहास घडवणाऱ्या स्त्रियांबद्दल माहिती दिली व चर्चा केली. ह्या सगळ्या गोष्टींचं मुलांना खूप कौतुक वाटते. लहान मुले नेहमी भेटवस्तूंसाठी उत्साहित असतात. हे सगळं करताना मला मनापासून खूप बरे वाटले. शाळेतील मुलं माझी खूप लाडकी आहेत तसेच ते माझे छान छोटे मित्र सुद्धा आहेत. आमचा तर पुढच्या वेळी सोबत बिर्याणी बनवून एकत्र मिळून जेवायचं प्लॅन पण आहे त्यासाठीही आम्ही खूप उत्साहित आहोत.”