नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि कुलगुरूंच्यात सुरू असणाऱ्या संघर्षात भाजपाचे मार्गदर्शक मुरली मनोहर जोशी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी आश्चर्यकारकरित्या कुलगुरू एम जगदेशकुमार यांच्या हकालपट्टीची मागणी करत भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
विद्यापीठाने वाढवलेल्या शुल्काच्या पेचप्रसंगावर कुलगुरूंनी तोडगा घेऊन यावे, असे शिक्षण मंत्रालयाने दोनदा कळवल्याच्या वृत्ताकडे अटल बिहारी वाजपेयी मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री पद भुषवलेल्या जोशी यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारच्या प्रस्तावाची दखल न घेण्याचा उद्दामपणा कुलगुरू दाखवत आहेत, हे धक्कादायक आहे. हे वर्तन निषेधार्ह आहे. माझ्या मते अशा कुलगुरूंना त्या पदावर राहू देऊ नये, असे ट्विट त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या मोर्चानंतर तासाभरातच ते केल्याने हा भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे.