“आडवाणी आणि जोशी यांना त्यांच्या शिष्यानेच…” – ज्येष्ठ भाजप नेत्याचा निशाणा

मेट्रोमॅनसाठी भाजपने नियम मोडला; यशवंत सिन्हा यांचा निशाणा

नवी दिल्ली – मेट्रोमॅन म्हणून प्रसिध्द असलेले ई. श्रीधरन यांनी वयाच्या 88 व्या वर्षी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याच्या मुद्‌द्‌यावरून माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. श्रीधरन यांच्यासाठी पक्षाने बनवलेले नियमच मोडीत काढण्यात आल्याचे त्यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

ते म्हणाले की, 88 वर्षांच्या श्रीधरन यांना पक्षात सहभागी करून केरळच्या राजकारणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. भाजपला केरळमध्ये बळ वाढवायचे आहे व त्यात श्रीधरन यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल. आपल्याला राज्यपाल व्हायचे नसल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले असून मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

2014 मध्ये वयाच्या नियमाचाच आधार घेत लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मंत्रीपद नाकारण्यात आले होते व नंतरच्या निवडणुकीत तर उमेदवारीही दिली गेली नाही. मार्गदर्शक मंडळात त्यांची रवानगी करण्यात आली.

अर्थात त्यानंतरच 75 पेक्षा जास्त वय असलेल्या येडियुरप्पा यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्यात आले. याचाच अर्थ असा होतो की आडवाणी आणि जोशी यांना त्यांच्या शिष्यानेच बाहेरचा रस्ता दाखवला आणि या शिष्यामुळेच त्यांची राजकीय कारकीर्द संपली.

सिन्हा यांनी या सगळ्याची तुलना बैरम खानशी केली आहे. अर्थात आडवाणी आणि जोशी यांना दिल्लीतून बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यांना सगळ्या सुविधा आणि सुरक्षेसह दिल्लीत राहु दिले जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अलिकडच्या काळात आपली या दोघांशी भेट झालेली नसल्याचे सांगतानाच ते चांगले असतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.