लखनौ: बाबरी मशिद पतन प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवला. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.के.यादव यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोशी यांनी जबाब नोंदवला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी हे उद्या याच प्रकरणी जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.
आयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेल्याप्रकरणी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम 313 अन्वये 32 आरोपींचा जबाब नोंदवण्याचे काम सध्या दैनंदिन स्वरुपात सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
6 डिसेंबर, 1992 रोजी कारसेवकांनी अयोध्येतील मशिद पाडली होती. या मशिदीच्या जागेवर भव्य राम मंदिर होते. म्हणून या ठिकाणी भगवान रामाचे भव्य मंदिर पुन्हा उभे करण्यात यावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचा भाग म्हणून ही कारसेवा करण्यात आली होती. हे आंदोलन देशभर पेटवणाऱ्यांमध्ये लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि भाजपचे अन्य नेते आघाडीवर होते.