दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या इसिसच्या तिघांना अटक

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाआधी महत्वपूर्ण कारवाई
इसिसने भारताकडे वाकडी नजर वळवल्याचा संशय

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या तिघांना गुरूवारी देशाची राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर ती महत्वपूर्ण कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांचे लागेबांधे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक जागतिक दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे इसिसने आपली वाकडी नजर भारताकडे वळवल्याचा संशय बळावला आहे.

तामीळनाडूतून तीन संशयित दहशतवादी नेपाळमार्गे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी देशाच्या राजधानीत किंवा उत्तरप्रदेशात दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला आहे. हल्ल्यानंतर ते नेपाळला आणि तिथून पाकिस्तानला पलायन करणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. अधिक तपासाअंती तीन संशयितांनी दिल्लीत भाड्याने एक रूम घेतल्याचे आणि काही शस्त्रास्त्रे जमवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील वजीराबाद परिसरात सकाळच्या सुमारास सापळा रचला. त्या परिसरात पोलिसांनी हटकवल्यावर संशयितांनी गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये अल्पकाळ चकमक झाली. त्या चकमकीनंतर तिघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले.

ख्वाजा मोईद्दीन, अब्दुल समद आणि सैद अली नवाज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते तिघेही तामीळनाडूचे रहिवासी आहेत. त्यापैकी दोघे हिंदू मुन्नानी नेते के.पी. सुरेश कुमार यांच्या हत्येप्रकरणी सशर्त जामीन मिळाल्याने तुरूंगाबाहेर आहेत. मोईद्दीन हा इसिसमधील काही म्होरक्‍यांच्या संपर्कात होता. त्याने जामिनावर सुटका झाल्यानंतर इसिसचे जाळे निर्माण करण्याची नापाक योजना बनवली. त्याच्यासह तिघांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था परदेशातील एका म्होरक्‍याने केल्याची माहिती पुढे आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.