पान टपरीवाल्याला दिला होता दम
पुणे – पान टपरीवाल्याशी वाद घातल्याने एका अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. तो संबंधित मुलाचा मृतदेह वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात बेवारस अवस्थेत 10 जुलै रोजी वानवडी पोलिसांना आढळून आला. या प्रकरणातील आरोपींना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले.
रोहित गौतम बनसोडे (27, रा. उंड्री), अजय विजय गायकवाड (22, रा. महंमदवाडी), श्रीकांत भीमराव साठे (20, रा. कृष्णानगर), अक्षय अनिल जाधव (20, रा. वानवडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी एका 12 वर्षांच्या मुलाचा खून केला.
वानवडी पोलिसांना 10 जुलै रोजी जंगल परिसरात एक अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान 9 जुलै रोजी त्याच्या पालकांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, हा अपहरण झालेल्याच मुलाचा मृतदेह असल्याची ओळख पटली नव्हती.
दरम्यान, खुनाचा तपास करत असताना कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांना पोलीस शिपाई किशोर वळे यांनी संबंधित मुलाचा खून करणारे ज्या गाडीवरून जंगलात आले होते ती गाडी महंमदवाडी येथील एका मेडिकलजवळ उभी असल्याची माहिती दिली. त्यानुसार संबंधित गाडीवरून शोध घेत रोहीत, अजय, श्रीकांत आणि अक्षयला ताब्यात घेतले. तपासादरम्यान पान टपरीचालक रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी आरोपी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरून संबंधित बालकास भेटायला बोलवले असल्याचा निरोप दिला. यानंतर ते दोघे बालकास घेऊन महंमदवाडी येथे गेले. तेथे सतीश गायकवाड, अजय गायकवाड,श्रीकांत साठे, अक्षय जाधव यांनी त्याला दारु पाजली. यानंतर दगडाने ठेचून खून केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, संतोष नाईक, पोलीस कर्मचारी सुनिल धिवार, निलेश वणवे, अमित साळुंखे, संजीव कळंबे, ज्योतीबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, किरण मोरे यांच्या पथकाने केली.
पानटपरी चालवू न देण्याचा दम
यातील रोशन याची पानटपरी आहे. त्याला बालकाने अनेकदा दमदाटी केली होती. टपरी चालवू देणार नाही असा दम दिला होता. यामुळे त्याने तो मानत असलेल्या सतीश गायकवाड याच्याकडे त्याला मित्रांच्या मदतीने नेले. तेथे सतिश पवारसमोर बालकाने पुन्हा अरेरावी केली. यामुळे अखेर सर्वांनी मिळून त्याचा काटा काढला.