लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा; केबल चालकांशी सकारात्मक चर्चा
महापालिकेचा अभिनव उपक्रम
पुणे – लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या शाळा पुन्हा सुरू होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे घरांमध्ये अडकून पडलेल्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता घरबसल्या लोकल केबलच्या माध्यमातून शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. यासाठी शहरातील लोकल केबलचालकांशी पालिकेने नुकतीच चर्चा केली असून त्यासाठी एक स्वतंत्र केबल चॅनेल महापालिकेस उपलब्ध करून देण्याची तयारी केबल चालकांनी दर्शविली आहे.
शहरात महापालिकेच्या सुमारे 287 शाळा असून त्यामध्ये एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मार्च महिन्यातच लॉकडाऊन जाहीर झाल्याने या वर्षी शाळांच्या वार्षिक परीक्षाही झालेल्या नाहीत तसेच नवीन वर्षांचे प्रवेश सुरू होऊन अद्याप शाळाही सुरूही झालेल्या नाहीत.
ऑगस्ट ते सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे पालिकेनेच आता स्थानिक केबल ऑपरेटरच्या माध्यमातून एका लोकल चॅनेलच्या माध्यमातून सकाळ आणि दुपारच्या सत्रात शाळांचा अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतला आहे.
…त्यामुळे ऑनलाइनऐवजी “केबल’
महापालिकेने सर्व शाळांसाठी ई-लर्निंग यंत्रणा उभारलेली आहे. या माध्यमातून थेट संवाद साधने थेट प्रशिक्षण देणे शक्य आहे. या स्टुडिओचा वापर करून या ठिकाणी शिक्षक वर्गांच्या नियोजनानुसार, त्या त्यावेळेत शिकवतील, त्याचे थेट प्रक्षेपण या केबलच्या माध्यमातून केले जाईल. टॅबद्वारे अथवा इतर डिजिटल सुविधेद्वारे मुलांना ऑनलाइन शिक्षण द्यायचे झाल्यास मुलांच्या पालकांकडे मोबाइल तसेच इंटरनेट नाहीत. पण, जवळपास प्रत्येकाच्या घरात टीव्ही आणि केबल आहे त्यामुळे चॅनेलद्वारे शिक्षण देणे सोपे जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.