नाइट शेल्टरमध्ये राहण्यास नकार
पुणे – लॉकडाऊनमुळे शहरात अडकून पडलेल्या राज्य आणि परराज्यांतील मजुरांसह बेघरांना महापालिकेने सुमारे 29 शाळांमध्ये शेल्टर सुविधा उपलब्ध करून दिली. आता लॉकडाऊन शिथिल होताच ही सर्व शेल्टर्स रिकामी झाली असून बेघर असणारे रातोरात पळून जाऊन पुन्हा रस्त्यांवर राहात आहेत. त्यामुळे पालिकेने जवळपास सर्वच शेल्टर बंद केली असून तेथे आता स्वच्छता आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
सर्व बेघरांना महापालिकेने वेगवेगळ्या 29 ठिकाणी शेल्टर सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यात सुमारे 1,734 जणांच्या निवाऱ्याची सुविधा केली होती. येथे या नागरिकांना दोन वेळचे जेवण, नाष्टा तसेच चहा दिला जात होता. तसेच आठवड्यातून दोन वेळा त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जात होती. दि. 3 मेपासून लॉकडाऊन शिथिल करत अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यास परवानगी मिळाली.
त्यावेळी या शेल्टरमधील सुमारे 1,200 जण घरी परतले. राज्यभरातील नागरिकही घरी परतल्यानंतर अनेक शेल्टरमध्ये बेघर लोकच राहात होते. त्यांनी रस्त्यांवर न राहता शेल्टरमध्ये राहण्याच्या सूचना पालिकेनेही केल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्यास नकार देत, शेल्टरमधून पलायन केले आहे. तर उर्वरित बेघरांनी शाळांमध्ये राहण्यास नकार देत प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही वाद घातला. त्यानंतर ते स्वत: बाहेर पडले असून त्यांनी पुन्हा उड्डाणपुलांखाली आपले बस्तान मांडले आहे.
दरम्यान, सर्व शेल्टर रिकामी झाल्यानंतर महापालिकेने या शाळा शैक्षणिक वर्षांसाठी पुन्हा सज्ज करण्यास सुरूवात केली असून, येथे साफसफाई तसेच औषध फवारणी सुरू केल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.