पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख आहे. मात्र, करोनामुळे या श्रीमंतीला घरघर लागली असून यंदाचे अंदाजपत्रक तब्बल 627 कोटींनी घसरले आहे. सन 2022-23 या अर्थिक वर्षासाठीचे 6 हजार 497 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीला सादर केले. दरवर्षी अंदाजपत्रकात वाढ होते असा इतिहास असताना यंदाच्या अंदाजपत्रकाने या इतिहासाला छेद दिला असून पहिल्यांदाच 627 कोटींनी घट असलेले अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकाला करोनाचा फटका बसला असून पुढील वर्षांत त्याचा विकास कामांवरही परिणाम होणार हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहरामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे सन 2022-23 च्या अंदाजपत्रकामध्ये नवे प्रकल्प, योजना तसेच मोठी खर्चीक कामे टाळली आहेत. मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख आणि केंद्र व राज्य शासनाचे अनुदान पकडून एकूण 6 हजार 497 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायीसमोर सादर करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण 615 कोटी रुपयांची घट आहे. गेल्या वर्षी मूळ अंदाजपत्रक 5 हजार 588 कोटी 78 लाखांचे होते. तर आरंभीची शिल्लक तब्बल 625 कोटी 10 लाख रुपये होती. यंदाचे अंदाजपत्रक 4 हजार 961 कोटी 65 लाखांचे आहे.
तर शिल्लक फक्त 5 कोटी 9 लाख रुपये आहे. त्यामुळे महापालिकेवर अर्थिक संकट निर्माण होण्याचेच संकेत या अंदाजपत्रकातून मिळाले आहेत. आगामी अर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या वतीने कोणताही मोठा प्रकल्प राबवला जाणार नसून खर्चीक कामांना ब्रेक देण्यात आला आहे. दरम्यान, या अंदाजपत्रकामध्ये जमा बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) करातून 201 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) 2 हजार 50 कोटी 1 लाख अनुदान मिळेल असे ग्रहित धरले आहे. मालमत्ता करातून 950 कोटी, गुंतवणुकीवरील व्याजातून 140 कोटी 19 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
पाणीपट्टीतून 84 कोटी 59 लाख, बांधकाम परवाना विभागातून 950 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे अपेक्षित आहे. तर, खर्चाच्या बाजूला सामान्य प्रशासन विभागावर 1 हजार 176 कोटी 58 लाख, नियोजन व नियमन 184 कोटी 84 लाख, सार्वजनिक बांधकाम 1 हजार 571 कोटी 47 लाख, आरोग्य 296 कोटी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन 449 कोटी 85 लाख, नागरी सुविधांवर 586 कोटी 19 लाख रुपये खर्च होणार आहे. तसेच शहरी वनीकरण 197 कोटी 20 लाख, शहरी गरिबी निर्मुलन व समाजकल्याण (महसुली व भांडवली) 159 कोटी 32 लाख, इतर सेवांसाठी 254 कोटी 94 लाख आणि महसुली खर्चासाठी 80 कोटी 24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 4 हजार 961 कोटी 65 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तर त्यामध्ये 4 हजार 956 कोटी 63 लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेनुसार शहरातील सर्व भागांमध्ये व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत शासनाच्या व महापालिकेच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी घोषणा करण्यात आली आहे.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त
महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकासाठी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आज आले नाही. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी अंदाजपत्रक सादर केले आहे. 23 फेब्रुवारी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ही विशेष सभा तहकूब करण्यात आली आहे.
– ऍड. नितीन लांडगे, अध्यक्ष स्थायी समिती