अमेरिकेच्या धोरणाबद्दल पुन्हा साशंकता निर्माण होईल
नवी दिल्ली, दि. 18 – अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा शस्त्रपुरवठा सुरू केल्यास भारत-पाकमध्ये नवे तणाव तर निर्माण होतीलच शिवाय या प्रदेशातील अमेरिकेच्या भूमिकेबद्दल पुन्हा पूर्वीची साशंकता निर्माण होईल, असा इशारा परराष्ट्रमंत्री चव्हाण यांनी लोकसभेत दिला. पाकला पुन्हा शस्त्रपुरवठा झाला तरी स्वतःचे स्वातंत्र्य रक्षण करण्याची भारताची क्षमता अजिबात नाही. भारत आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास समर्थ आहे, हे जगाला व आमच्या शेजाऱ्यालाही माहीत आहे, असे चव्हाण म्हणाले.
गीर जंगलात 180 सिंह
सासन (गुजरात) – गीर जंगलात एकूण 180 सिंह आहेत, असे त्यांच्या खानेसुमारीवरून आढळून आले आहे. या 180 सिंहांत 53 नर, 77 माद्या व 50 छावे आहेत. खानेसुमारीसाठी यावेळी नवीन पद्धत वापरण्यात आली. तांबड्या रंगाने भरलेले फुगे सिंहाच्या अंगावर फेकण्यात आले.
मी भारताचाच नागरिक आहे – शेख अब्दुल्ला
कोचीन – मी भारताचा आणि केवळ भारताचाच नागरिक आहे, असे उद्गार शेख अब्दुल्ला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना काढले. जो मनुष्य भारताच्या घटना समितीचा सभासद होता व ज्याने घटनेवर सही केलेली आहे तो भारताशिवाय दुसऱ्या कुठल्या देशाचा नागरिक असू शकेल काय? असे अब्दुल्ला म्हणाले.
…तर तेलाच्या किमती कमी होतील! सेंट मॉर्टिझ – तेल उत्पादक देशांना लागणाऱ्या औद्योगिक व कृषी मालाच्या किमती जर कमी करण्यात आल्या तर तेलाच्या किमती कमी होण्याचा संभव आहे, असे इराणच्या शहांनी सूचित केले.
किरणोत्सर्गी रंग!
नवी दिल्ली – एखादा इसम हृदयविकाराने आजारी आहे काय हे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक किरणोत्सर्गी रंग तयार केला असल्याचे युनायटेड स्टेटस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टमध्ये म्हटले आहे.