पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १५ एप्रिल दरम्यान विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मोकळ्या मैदानात सभामंडप टाकण्याची जय्यत तयारी सुरु आहे.
सभामंडपाचे काम जवळपास पूर्ण झाले असून व्यासपीठ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांत व्यासपीठासह विद्युत रोषणाई, प्रेक्षकांची आसन व्यवस्था ही कामे देखील पूर्ण केली जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये शाहिरी जलसा, प्रबोधनात्मक, गीत गायन आदी सांस्कृतीक कार्यक्रमांचे सादरिकरण केले जाणार आहे.
त्यासाठी महापालिकेकडून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाच्या मागील मोकळ्या मैदानात सभामंडप व व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. सभामंडप तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर, कलाकारांची बैठक व्यवस्था असणारे व्यासपीठ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. व्यासपीठाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत रोषणाई देखील तयार केली जाणार आहे.
यंदा कार्यक्रमाचा सभामंडप आणि व्यासपीठ आकाराने विस्तिर्ण केल्याने त्याला भव्यदिव्य स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्या उन्हाचा पारा ४२ वर पोहोचला आहे. उन्हाची तिव्रता लक्षात घेता कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची काळजी घेऊन सभामंडप तयार करण्यात आला आहे.
त्यामध्ये कितीही वेळ बसून कार्यक्रमाचा आनंद घेणा-या प्रेक्षकांना उन्हाच्या कडाक्याचा कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर सभामंडपात आणि व्यासपीठावर कुलर आणि फॅनची व्यवस्था देखील केली जाणार आहे. पुढील दोन दिवसांत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती त्याठिकाणी काम करणा-या एका कामगाराने सांगितली.