पुणे : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून, त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे, अशी माहिती जहांगीर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सत्यजित सिंग गिल यांनी शुक्रवारी दिली. राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम या वेळी उपस्थित होते.
खासदार राजीव सातव यांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. गिल आणि डॉ. कदम यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
‘सातव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत काल संध्याकाळपासून सुधारणा होत आहे. त्यांना शंभर टक्के कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती आता ४५ वर आली आहे. ते लवकरच बरे होतील आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील, असा विश्वास डॉ. कदम यांनी व्यक्त केला.
त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्याविषयी विचारले असता कदम म्हणाले की, येथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आत्ता त्यांना हलवण्याची गरज नाही. मुंबईतील डॉ. राहुल पंडित यांनी पुण्यात येऊन त्यांच्या उपचाराची माहिती घेतली आहे.
कालपासून महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी जहांगीर रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्रवारी नाना पटोले हे भेटण्यासाठी आले होते, असे कदम यांनी सांगितले.