पुणे: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येतीची माहिती मिळताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दखल घेत डॉक्टरांशी संपर्क केला होता. आता सातव यांच्या तब्येतीसंदर्भात काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी माहिती दिली.
सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही वाढ होत आहे अशी माहिती पुण्यातील जहांगिर रूग्णालयात सातव यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यजितसिंग गील यांनी दिली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यावेळी उपस्थित होते. उपचारांसाठी म्हणून सातव यांना कुठेही हलवणार नसून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
खासदार राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी करोना चाचणी केली होती. २२ तारखेला त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना २५ तारखेला जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
खासदार सातव यांच्या तब्येतीबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारपूस केली आ. तर राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या तब्येतीवर नजर ठेवून आहेत.