दु:खद ! रोहित सरदाना पाठोपाठ उस्मानाबादेतील सख्ख्या भावांचा करोनाने मृत्यू; दोघेही होते पत्रकार

उस्मानाबाद- प्रख्यात पत्रकार,  हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे झालेलं निधनाचं वृत्त ताजे असताना महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथील दोन पत्रकारांना देखील करोनाने हिरावलं आहे. विशेष म्हणजे हे दोघे सख्खे भाऊ होते. दोघांवर हैद्राबाद येथे उपचार सुरू होते. आठ दिवसांच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाला.

पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान गुरुवारी हैद्राबाद येथे निधन झाले. 22 एप्रिल रोजी त्यांचे बंधू आणि ज्येष्ठ संपादक मोतीचंद बेदमुथा यांचेही कोरोना उपचारादरम्यान निधन झाले होते. एका धक्क्यातून बेदमुथा कुटुंब सावरत नाही, तोच अवघ्या 8 दिवसात पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. विजयकुमार आणि मोतीचंद या दोघा भावांची जोडी पत्रकारिता क्षेत्रात सर्वश्रूत होती. या दोघांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्षे विजयकुमार यांनी पत्रकारिता क्षेत्रात दैनिक लोकमत, पुढारी या वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्य पातळीवर कार्य केले होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पत्रकारांच्या अनेक पिढ्याही घडल्या आहेत. त्यांचे बंधु मोतीचंद बेदमुथा यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये मध्ये काम केले. तसेच दैनिक समय सारथी वृत्तपत्राचे संपादकपद भूषवले होते.

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने बेदमुथा भावांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विजयकुमार यांच्यावर हैद्राबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.