प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -प्रत्येक स्त्रीमध्ये अपार क्षमता आहे. ऑलिंपिक किंवा राष्ट्रकुलसारख्या क्रीडास्पर्धा असोत किंवा दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल असोत. सर्व ठिकाणी वर्चस्व आहे ते स्त्रियांचेच. पुरुषांमध्ये कमी प्रमाणात आढळणारे वात्सल्य, क्षमा आणि धैर्य हे गुण स्त्रीमध्ये आढळतात. आता स्त्रियांनी शक्तीचा उपयोग राष्ट्रबांधणीसाठी करण्यासाठी सिद्ध व्हायला पाहिजे, असे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
महर्षी कर्वे संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी संस्थेच्याच परिसरात उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य प्रभाकर सोनपाटकी, किरण बराटे, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव प्रदीप वाजे, महिलाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी, शिवराम मेंगडे, सुशील मेंगडे, डॉ. अनिल कुलकर्णी, अलताफ हुसेन आदी उपस्थित होते.
खुल्या व्यायामशाळेची सुरुवात म्हणजे स्त्री सक्षमीकरणाच्या निरंतर प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून, आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अधिकाधिक मुली याचा लाभ घेतील आणि सक्षम बनतील, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.
स्त्रीमध्ये असणारी सुप्त शक्ती महर्षी कर्वे यांनी ओळखली होती आणि स्त्रीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक उपक्रम त्यांनी राबविले होते. त्या काळात म्हणजे 1939 सालात त्यांनी संस्थेतील मुलींसाठी “कृष्णतलाव’ नावाचा पोहण्याचा तलाव बांधून घेतला होता. आगामी काळात मुलींमधील क्रीडा कौशल्यांचा योग्य विकास होण्यासाठी ऑलिंपिक धर्तीवरील स्पोर्टस अकादमी सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे, असे देव यांनी सांगितले.