MP Blast : मध्य प्रदेशातील हरदा येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आली असून त्यात ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेत ४० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. स्फोटानंतर फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली.
समोर आलेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 50 घरे आगीत जळून खाक झाली आहेत. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. सध्या 20 हून अधिक जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपासच्या जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या गाड्याही हरदाकडे रवाना झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मगरधा रोडवर असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. कारखान्यातून उठणाऱ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
#WATCH | Madhya Pradesh: People injured in the massive fire that broke out in a firecracker factory in Harda, are being shifted to a hospital for treatment. Fire tenders have reached the spot, several people are feared trapped. pic.twitter.com/rwEzdIUUJX
— ANI (@ANI) February 6, 2024
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत मंत्री उदय प्रताप सिंग, एसीएस अजित केसरी, डीजी होमगार्ड अरविंद कुमार यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर भोपाळ आणि इंदूरमधील वैद्यकीय महाविद्यालये, भोपाळमधील एम्स आणि बर्न युनिटलाही आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय इंदूर आणि भोपाळ येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतकार्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हरदा फटाका कारखान्याला लागलेल्या आगीबाबत नर्मदापुरमहून हरदा येथे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पाठवण्यात येत आहेत. नर्मदापुरमचे कर्मचारीही हरदाला रवाना झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार, नर्मदापुरमहून 6 अग्निशमन दल आणि 4 रुग्णवाहिका डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह हरदाला रवाना झाल्या आहेत.