मरराकेश (मोरोक्को) – मोरोक्कोमध्ये आज झालेल्या भीषण भूकंपामध्ये किमान 1000 जण ठार आणि 329 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर इतक्या क्षमतेची होती. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून नागरिकांनी बचावासाठी रस्त्यांवर धाव घेतल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री 3 वाजून 41 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू ओकामेदेन या शहराच्या पश्चिमेकडे 56 किलोमीटरवर आणि मरराकेश शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर होता, असे युनायटेड स्टेटस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे.
मरराकेश शहरातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या शहराला “युनेस्को’ने वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या शहरातील एक मशिद पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कार चिरडल्या गेल्या असल्याचे स्थानिव वृत्तवाहिनीच्या व्हिडीओमध्ये दर्शवण्यात आले आहे.
भूकंपामुळे अनेक भागांमध्ये भूस्खलन झाले असून डोंगराचा मोठा भाग देखील कोसळला आहे. त्याखाली शेकडो घरे गाडली गेली आहेत. गाडले गेलेल्या लोकांबाबत निश्चित आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. जखमींना रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे. तर ढिगाऱ्यांखाली गाडले गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू केले गेले आहे. दरम्यान, आज दिल्ली येथे झालेल्या जी-20 परिषदेत भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजलीही वाहण्यात आली.