न्यूयॉर्क – न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियाच्या मध्य भागाला शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. भूकंपामुळे मोठ्या इमारती हादरल्या. मात्र मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. न्यूयॉर्कच्या नागरिकांसाठी भूकंपाचा धक्का जाणवणे ही नित्याची बाब नसल्यामुळे थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भूकंपाचा धक्का सुमारे ४२ दशलक्ष नागरिकांना जाणवला असावा, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्व्हेक्षण संस्थेने म्हटले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूयॉर्कपासून पश्चिमेला ७२ किलोमीटरवर न्यूजर्सीमधील व्हाईट हाऊस स्टेशनजवळ होता आणि भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर इतकी होती.
बाल्टिमोरपासून बोस्टनपर्यंतच्या नागरिकांना भूकंपामुळे जमीन हादरल्याचे जाणवले. मात्र त्यामुळे कोठेही पडझड झाली नाही. पूल आणि सार्वजनिक इमारतींच्या सुरक्षिततेचा आढावा अधिकार् यांकडून घेतला जात आहे.
काही विमानांची उड्डाणे लांबणीवर टाकण्यात आली, किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. फिलाडेल्फियातील रेल्वेसेवा खबरदारी म्हणून स्थगित करण्यात आली होती.
२०११ नंतरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का…
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीला भूकंपाचे धक्के कमी प्रमाणात जाणवत असतात. त्यामुळे येथील नागरिकांना भूकंपाची सवय नाही. यापूर्वी न्यूयॉर्क सिटीला १७३७ साली भूकंपाचा ५ रिश्टर क्षमतेचा धक्का जाणवला होता.
सर्वात अलिकडे २३ ऑगस्ट २०११ रोजी कॅनडात झालेल्या भूकंपाचे धक्के न्यूयॉर्कमध्ये जाणवले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला जाणवलेला हा सर्वात मोठा भूकंप होता.