दुबई – कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) आयपीएल स्पर्धेच्या या दुसऱ्या पर्वातील सलग दोन सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्ले ऑफची आशा जिवंत ठेवली आहे. मात्र, त्यात कोलकाताचा कर्णधार इयान मॉर्गनने कोड वर्डच्या माध्यमातून ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या आपल्या प्रशिक्षकांची मदत घेतल्याचे आता उघड होत आहे.
मॉर्गन ही अशी मदत घेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईची रोहित शर्मा आणि क्वांटन डीकॉक ही जोडी मैदानात असताना मॉर्गनला ड्रेसिंग रूममधून केकेआरचे ऍनालिस्ट नॅथन लीमन यांनी कोड वर्डच्या माध्यमातून गुप्त संदेश दिला. लीमनने एका प्ले कार्डच्या मदतीने मॉर्गनला हा संदेश दिला. या प्ले कार्डवर लिहिलेला मजकूर इतका मोठ्या अक्षरातील होता की व्हिडिओमध्ये तो कोणीही वाचू शकेल. लीमन यांनी या माध्यमातून मॉर्गनला गुप्त संदेश पाठवल्याचे बोलले जात आहे.
मॉर्गनला कोड वर्डच्या माध्यमातून संदेश पाठवणारे नॅथन लीमन हे इंग्लंड क्रिकेट संघाचे ऍनालिस्ट आहेत. यापूर्वी 2020 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही लीमन यांनी कोडवर्डच्या माध्यमातून मॉर्गनला संदेश पाठवला होता. यात काहीही नियमबाह्य नसले तरीही असे करणे योग्य नाही, असे सांगत भारतीय संघाचा माजी कसोटी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मॉर्गनवर टीका केली आहे.
जर ड्रेसिंग रूम किंवा डगआऊटमधून अशी मदत मिळणार असेल, तर कुणीही कर्णधार होऊ शकतो, असेही सेहवागने सांगितले आहे.