भोसरी, चऱ्होली सर्वाधिक, तर नेहरूनगर, खराळवाडीमध्ये सर्वात कमी रुग्ण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. शहरातील भोसरी, गवळीनगर, चऱ्होली व दिघी या भागामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागामध्ये करोनाचे 1893 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापाठोपाठ “ब’ प्रभागातील रावेत किवळे, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड या भागात करोनाचे 1668 रुग्ण उपचाराधीन आहेत. सद्यस्थितीत शहरामध्ये 9 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांमध्येही वाढ होत आहे. शहरातील 9 हजार 394 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शहरात आजपर्यंत 73 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 73 हजारांहून अधिक जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 56 हजार 544 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 1206 तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 412 अशा 1618 जणांचा आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये कोणत्या भागामध्ये किती रुग्ण आहेत याबाबत महापालिका प्रशासनाकडून नकाशा प्रसिद्ध केला जातो. त्यानुसार सद्यस्थितीत शहरातील भोसरी, चऱ्होली, दिघीमध्ये करोनाचे सर्वाधिक म्हणजेच 1893 रुग्ण उपचाराधीन आहेत.