नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा राजस्थानमधील जयपूर विमानतळावरून अटक केली. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी हा दावा केला आहे.
मोरबी दुर्घटनेबाबत गोखले यांच्यावर पंतप्रधान मोदींबाबत खोटी बातमी पसरवल्याचा आरोप आहे. टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी जयपूर विमानतळावरून अटक केल्याचे ओब्रायन यांनी ट्विट केले आहे.
सोमवारी साकेतने नवी दिल्लीहून जयपूरला रात्री ९ वाजता उड्डाण केले. ते विमानतळावर उतरले तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.
पक्षाचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी “तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. साकेत गोखले सोमवारी विमानाने नवी दिल्लीवरुन जयपूरला पोहोचले होते. गुजरात पोलीस यावेळी राजस्थानमध्ये विमानतळावर त्यांची वाट पाहत उभे होते. विमानतळावर पोहोचताच त्यांच्यावर कारवाई केली,” असा दावा ट्वीट करत केला आहे.