“एमएसआरडीसी’तर्फे अधिसूचना जारी, काम सुरू होणार
पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्यातील रिंगरोडच्या कामास गती घेतली आहे. खेड शिवापूर टोल नाका ते उर्से टोल नाका या पश्चिम भागातील रिंगरोडचे भूसंपादनाचे काम सुरू असतानाच आता “एमएसआरडीसी’ने पूर्व भागातील रिंगरोडची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग (परंदवडी ता. मावळ) – नाशिक – सोलापूर आणि सातारा महामार्गाला (केळवडे ता.भोर) जोडणारा असा पूर्व भागातील रिंगरोड असणार आहे. पूर्व भागातील रिंगरोड सुमारे 67 किलोमीटर लांबीचा असून 110 मीटर रुंदीचा असणार आहे. या रिंग़रोडसाठी 594 हेक्टर जागेची आवश्यकता असून 4 हजार 713 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी “एमएसआरडीसी’ने रिंगरोडचे काम हाती घेतले. हा रिंगरोड दोन टप्प्यांत विभागण्यात आला असून पूर्व रिंगरोड आणि पश्चिम रोंड असे दोन भाग करण्यात आले आहे.
यामध्ये पश्चिम भागातील पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे (ता. भोर) ते पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील परंदवडी (ता. मावळ) असा असणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. आता पूर्व रिंगरोडची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने हे काम मार्गी लागणार आहे. इतक्या दिवस फक्त कागदावरच आणि फक्त चर्चाच होत असलेल्या रिंगरोड प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
असा असणार रिंगरोड
परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे, खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी,केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव, तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी,डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची, सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे, कांबरे, नायगाव, केळवडे.
594 हेक्टर जागेची आवश्यकता
4,713 कोटी रु. खर्च अपेक्षित
67 कि.मी. रस्त्याची लांबी