मोहोळ (प्रतिनिधी) – मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हनुमंत माने यांच्याविरोधात जातीचा दाखल व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. ही याचिका शिवसेनेचे पराभूत उमेदवार नागनाथ क्षिरसागर यांचा मुलगा सोमेश क्षिरसागर यांनी दाखल केली होती.
उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एखाद्या आमदार यशवंत माने व कुंटुंबाचे जातीचा दाखल व जात वैधता प्रमाण पत्राचा खरेपणा समोर आला आहे. जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांनी आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हनुमंत माने यांचा जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल यापूर्वी २२ सप्टेंबर २०१८ व ६ नोव्हेंबर २०२० रोजी व नागपूर खंडपीठाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिला आहे. तरी देखील सोमेश क्षिरसागर यांच्या याचिकेला आव्हान म्हणून आमदार यशवंत माने व बंधू हनुमंत माने यांचे जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याची याचिका दाखल केली होती.
याबाबत दैनिक प्रभातशी बोलताना आमदार यशवंत माने यांनी, ‘अखेर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने पुन्हा सोमेश क्षिरसागर यांची याचिका फेटाळली आहे .यामुळे राजकीय द्वेषातून इंदापूर तालुक्यातील छुपे विरोधकांच्या मदतीने मोहोळचे सोमेश क्षिरसागर यांनी दाखल केलेली याचिका ही पून्हा एखादा पूर्णतः खोटे असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सिध्द झाले आहे. आमचा न्याय देवतावर पूर्ण विश्वास आहे. शिवाय न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एखादा इंदापूर व मोहोळ तालुक्यातील विरोधकांच्या पदरी मोठे अपयश आले आहे.’ असे सांगितले.