मुंबई : भाजप नेता मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीट केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्विटवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली आहे. त्याआधीच मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली. मिटकरी यांनी म्हटले की, मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा जनतेच्या प्रश्नावर, स्त्री अत्याचारावर, जीएसटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही वाजत नाही, अशी टीका मिटकरींनी दिली. मोहित कंबोज हा ‘लष्कर-ए-देवेंद्र’ मधील तिसऱ्या फळीतील नेता असल्याचेही मिटकरींनी म्हटले.
पुढे बोलताना मिटकरी म्हणाले,”मोहित कंबोज यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना माहिती कोण देतंय याची चौकशी करणे गरजेचे आहे. ईडी कार्यालयात कंबोज बसत असतील त्यांची चौकशी करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली. मोहित कंबोज यांना ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते याची चौकशी करावी अशी मागणीदेखील मिटकरी यांनी केली.
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्याच आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. याच ट्विटमुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.