राजगुरूनगर – (रामचंद्र सोनवणे) : आपण पोलीस निरीक्षक असुन आपले थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहे.असे फोनवरून सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो. त्यासाठी मोबदला द्यावा लागेल असे म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रूबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली आहे.
संदिपराजे गणतराव निंबाळकर, (रा.वारु ,ता.मावळ, जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस सुनिल ज्ञानेश्वर बांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन सिताराम गायकवाड, रा विश्वकल्याण सोसायटी , शिरोली,ता. खेड, यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल होती. त्यांना शुक्रवारी (दि.१५) निंबाळकर याचा फोन आला की, मी तुम्हाला तुमच्या अदखलपात्र तक्रारीत मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल.
गायकवाड यांनी खेड पोलिसांना याबाबतीत लगेचच माहिती दिली. पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. तोतया निरीक्षकाला फोनवर विचारणा करून पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. संदीपराजे निंबाळकर हे पुढे-मागे पोलीस लिहिलेल्या आणि पोलिसांचा अधिकृत लोगो असलेल्या दुचाकीवर खेड पोलिस ठाण्यात हजर झाले. तेही पोलिसी रुबाबतच. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात त्याचा भांडाफोड केला.
तत्पूर्वी आपल्याकडील बनावट आय कार्ड दाखवत मी नागपुरात ट्रेनिंग घेतले त्यानंतर सहा वर्षे आजारी रजा घेऊन पुन्हा पोलीस निरीक्षक पदावर काम करीत आहे असे त्याने खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांना सांगितले. अखेर चौकशीत हा तोतया निघाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.संदीपराजे गणतराव निंबाळकर यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम 170,171,465,471 मो.व्ही.अँक्ट कलम 198 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, एका अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या बायकोचा निंबाळकर हा भाऊ म्हणजे साहेबांचा मेहुणा असल्याचे समजते. त्यामुळे या तोतया निरीक्षकाने आणखी कोणकोणत्या तक्रारीत किती जणांना मदत केली? किती माया गोळा केली ? याचा शोध घेण्याचे आव्हान खेड पोलिसांपुढे आहे.