कोलकाता – पश्चिम बंगालमधील मोबाईल इंटरनेट आणि ब्रॉडबॅन्ड इंटरनेट उद्या (दि. 7 मार्च) ते 16 मार्च पर्यंत स्थिगित करण्यात येणार आहे. मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर, कूचबेहार, जलपायगुडी, बीरभूम आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल इंटरनेट आणि ब्रॉडबॅन्ड इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे.
दिनांक 7 ते 9 मार्च, 11 आणि 12 मार्च आणि 14 ते 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सव्वा 3 वाजेपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी काही दिवसात काही बेकायदेशीर कारवायांसाठी इंटरनेट ट्रान्समिशन आणि व्हॉईस ओव्हर इंटरनेट टेलिफोनीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे, असे गुप्तचारांकडून समजले असल्याचे पश्चिम बंगालच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी म्हटले आहे.
प्रतिबंदात्मक आदेश नसल्यामुळे या बेकायदेशीर कारवाया होण्याची शक्यता असल्याचेही अतिरिक्त मुख्य सचिवांनी म्हटले आहे.
इंटरनेटच्या वापराने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ऍपच्या माध्यमातून कोणताही संदेश पाठवण्यास अथवा स्वीकारण्यास या काळात मज्जाव असणार आहे. बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशानेच या काळात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत, असे सरकारी आदेशामध्ये म्हटले आहे.